मुंबई : नुकतेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचे मुंबईत आगमन झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे काही भागात नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान होताना दिसून येत आहे. वांद्रे पश्चिम येथील पाली हिल येथे रिक्षावर अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामध्ये रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे.
मुंबईमध्ये परळ, दादर, माहिम, मुलुंड, कल्याण, डोंबिवली याठिकाणी पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. तसेच गुजरातमध्ये येणाऱ्या ‘वायू‘ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. वांद्रे येथील पाली हिल परिसरात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रिक्षावर झाड पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.


