🕒 1 min read
मुंबई:-गेले काही महिने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज हा तीव्र नाराज झाला. यानंतर, राज्यभरात तीव्र आंदोलन देखील करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ देण्याचे ठरवले. मात्र, यावर देखील मराठा नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे सुनावणी चालू असून मागील सुनावणीत न्यायालयाने मराठा समजला दिलासा दिला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह भरती व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर, आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत सर्व प्रकारच्या भरत्यांसह एमपीएससी परीक्षा देखील रद्द कराव्यात यासाठी मराठा समाज आक्रमक आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा व मेगाभरती देखील रखडली आहे.
अशातच, राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. यामुळे SEBC तुन अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गाच्याच अटी व नियम लागू होतील. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
दरम्यान, राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेबाबत शुद्धी परिपत्रक काढले जाणार आहे, असा दावा शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला. विनायक मेटेंनी काल संध्याकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. पोलीस भरतीच्या जीआरवर मेटेंनी आक्षेप घेतला होता.
पोलीस भरती प्रक्रियेत इडब्ल्यूएस अर्थात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे जीआरवर आक्षेप घेत शुद्धी परिपत्रक काढण्याची मागणी आपण केली होती. अनिल देशमुख यांनी सात जानेवारीला (आज) शुद्धी परिपत्रक काढणार, अशी ग्वाही दिल्याचा दावा विनायक मेटेंनी केला. एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना इडब्ल्यूएसचा लाभ मिळेल, असा विश्वास मेटेंनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास भाजपा कार्यकर्ते राज्यात घरोघर जाणार- पाटील
- सामान्य माणसांंसाठी घरांच्या किंमती कमी होणार का? आशिष शेलार यांचा सरकारला सवाल
- बांधकाम प्रकल्पांना प्रिमियमच्या निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही : देवेंद्र फडणवीस
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी मालिकेत पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
