मुंबई : देशात कर्करोगाची समस्या खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगावरील उपचार पद्धती देखील आधुनिक झाली असून यशस्वीरित्या यावर मातही करता येतं. दरम्यान, उपचाराची गरज आणि उपलब्ध सुविधा यात मोठी तफावत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने रुग्णांच्या सोयीसाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे.
टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक मुंबईत येतात. मुंबईत आल्यावर अनेकांची राहण्याची अडचण होते. टाटा रुग्णालयाच्या रस्त्यांवर, आजूबाजूच्या पुलाखाली रुग्णांचे नातेवाईक दिवस काढतात. रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुंबईत राहण्याची सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड याबाबत सकारात्मक व तातडीने हालचाल करून म्हाडाकडून टाटा रुग्णालयापासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हाजी कासिम चाळ परिसरातील १०० सदनिका म्हाडाने टाटा रुग्णालयाला देऊ केल्या आहेत. तर, रुग्णांच्या नातेवाईकांना सदनिका देण्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये यासाठी ही जबाबदारी टाटा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे देण्यात आली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या आज ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रूग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या. पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी आव्हाड म्हणाले, टाटा मेमोरियल रूग्णालय हे कर्करोग रूग्णांचे उपचार करण्यासाठी नावाजलेले असून या उपचारासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतू त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना फुटपाथवर रहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते.
त्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने रूग्णालयाशेजारी असलेल्या परळ शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ. बी. ए. रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून म्हाडाचा विभागीय घटक असणाऱ्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण १८८ सदनिका प्राप्त झाल्या आहेत.
यापैकी सद्य:स्थितीत ३०० चौरस फुट असलेल्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या १०० सदनिका नाममात्र दराने (रु. १ प्रति वर्ष) भाडेपट्टा करारनाम्यानुसार म्हाडाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून विशेष बाब म्हणून टाटा मेमोरियल रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहे.

