टीम महाराष्ट्र देशा : जाहिरात करणं जरी महत्वाचं मानलं जात असलं तरी एवढा खर्च…. हे ऐकून नक्की आश्चर्य वाटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए-१ सरकारच्या कार्यकाळात विविध प्रकारच्या जाहिरातींवर तब्बल ५ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे. मागील आर्थिक वर्षात तब्बल बाराशे कोटी रुपये खर्च करण्यात आला असून याबाबतची आकडेवारी ‘ब्यूरो ऑफ आउटरीच अँँण्ड कम्युनिकेशन’ने (बीओसी) दिली आहे.
मोदी सरकारने जाहिरातींवर किती खर्च केला याबाबतची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २२ मे रोजी केंद्र सरकारकडे मागितली होती. त्यानंतर ही माहिती बीओसीने दिली आहे. यामध्ये मोदी सरकारकडून मागील पाच वर्षांत जाहिरातींवर ५९०९ कोटी ३९ लाख ५१ हजार रुपये खर्च केला गेला आहे. तर तब्बल बाराशे कोटी रुपये मागील आर्थिक वर्षात खर्च करण्यात आले असल्याचे ही या माहिती अधिकाराद्वारे उघडकीस आले आहे.
मोदी सरकारच्या मागील पाच वर्षांमध्ये एनडीए सरकारने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि आउटडोर मीडिया यावर एकूण चार प्रकारांमध्ये जाहिराती केल्या. त्यामध्ये प्लॅन, नॉन प्लॅन यांसारख्या जाहिरातींवर हा सर्व खर्च केला गेला, असल्याची माहिती दिली गेली आहे.


