मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. तसेच दुसरीकडे कोरोनाच्या मुद्द्यावरून आता राजकारण पेटायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल जळगावात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.
दरम्यान त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, ‘राज्य सरकार कोरोना विरुद्ध लढाईमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारकडून हवे तसे प्रयत्न होताना दिसत नाही,’ असा आरोप महाजन यांनी केला.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळ घरी बसून कामकाज करत आहे. सरकार व प्रशासनात समन्वय नाही. अशीच स्थिती राहिली तर आगामी काळात राज्यातील कोरोनोचा आकडा 90 हजारांच्या घरात पोचेल,’ अशी भीती महाजन यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री ठाकरे हे आमदारकीच्या शपथविधीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडतात. मात्र, कोरोना संदर्भातील बैठकीसाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कामासाठी घराच्या बाहेरही पडत नाहीत,’ असं म्हणत महाजन यांनी टीकास्त्र सोडलं.

