मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात आणि राज्यात लॉकडाऊन पाळण्यात आले आहे. या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व आस्थापना, केंद्र बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी देखील काहीजण या आदेशांचे उल्लंघन करत अवैध दारू विक्री करत आहेत. तसेच अनेक जण आपली वाहन कडून मालाची वाहतूक करत आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांंवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे.
अवैध दारुविक्री, वाहतूक यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. काल एका दिवसात राज्यात १०२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४६ आरोपींना अटक करण्यात आली. ८ वाहने जप्त करण्यात आली असून १६ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच २४ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २ हजार ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९३७ आरोपींना अटक, तर ११५ वाहने जप्त करण्यात आली असून ५ कोटी ७१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दारू विकत घेण्यासाठी तळीराम गर्दी करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी दारूचे दर हे अवाच्यासवा वाढले आहेत. 60 रुपयाला मिळणारी देशी दारू तब्बल 150 रुपयांपर्यंत विकली जात आहे. तरीदेखील तळीराम एवढ्या महागातली दारू पिण्यास आपला जीव धोक्यात घालून केंद्रावर जात आहेत,

