🕒 1 min read
मुंबई : विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद जयंतीनिमित्त दरवर्षी विविध श्रेणींसाठी देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान केले जातात. गेली 22 वर्षे दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता आणि समाजमाध्यम पुरस्कार सोहळा राजभवनात 18 मे रोजी पार पडला. यावर्षी पहिल्यांदाच काही समाजमाध्यमात प्रभावी कामगिरी करणाऱ्यांना देखील या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यापैकी ट्विटरवर मराठी तरुणांना रोजगार देणारे शंतनु दलाल यांना सन्मानचिन्ह, मानधन, शाल आणि श्रीफळ देऊन देवर्षी नारद पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दिला गेला. इतक्या लहान वयात ‘शंतनू’ला का मिळाला देवर्षी नारद पुरस्कार? काय आहे त्याची कामगिरी? याविषयी जाणून घेण्यास सर्वच उत्साही असतील ना? तर पाहूया शंतनूचा प्रवास…
शंतनूचा प्रवास –
रोहितनं ट्विटर हँडलला शंतनू हे नाव दिलं आहे. यामागचं कारणही खास आहे. हे नाव त्याच्या आईनं मायेनं ठेवलं असून तिचा आशिर्वाद समजून हे नाव ट्विटर हँडलला दिल्याचं तो सांगतो. शंतनू उर्फ रोहित मूळचा औरंगाबादचा. रोहितने 2015 मध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबादमध्येच पूर्ण केलं, भरपूर येरझाऱ्या मारल्यानंतर आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे उंबरठे झिजवल्यानंतर एक वर्षाने त्याला नोकरी मिळाली. त्याला नोकरी मिळविण्यासाठी आलेल्या अडचणी अनुभवून त्याने पुढे नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांसाठी विचार करणं सुरू केलं. तरुण – तरुणींपर्यंत नोकरीच्या संधी पोहचविण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा वापर केला. ट्विटरवर ‘शंतनू’ या नावाने त्याने ट्विटर हँडल सुरू केलं. या ट्विटर हँडल वरून थ्रेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरूणांपर्यंत नोकरीच्या ओपनिंग्जविषयीची माहिती पोहचविण्यासाठी त्याने सुरुवात केली.
फ्रेशर आणि अनुभवी (सर्व क्षेत्रातील) जे कोणी नोकरी शोधत आहे त्यांच्यासाठी –
फ्रेशर आणि अनुभवी (सर्व क्षेत्रातील) जे कोणी नोकरी शोधत आहे त्यांच्यासाठी
१)नोकरी कशी शोधायची ?https://t.co/ooCeA8Btnc
२)रेझुमे कसा असावा ?
-१)https://t.co/NpvinCjAPz
-२)फ्रेशरसाठी काही रेझुमे चे काही नमुने https://t.co/vCUb4a42w6#मराठीनोकरी— Shantanu | शंतनु (@iamShantanu_D) April 13, 2021
स्किल डेव्हलपमेंटवर वेळोवेळी मार्गदर्शन करतो –
फक्त नोकरीच्या ओपनिंग्जविषयीची माहिती नाही तर शंतनू फ्रेशर्सना रेझ्युमे, डेव्हलप कव्हर लेटर या गोष्टी कशा पद्धतीनं तयार कराव्या, योग्य मेल कसा पाठवावा, स्ट्रॉंग कम्युनिकेशन कशा प्रकारे करावे, व कशाप्रकारे असले पाहिजे, आपलं कम्युनिकेशन प्रभावीपणे कसे सादर करावे याबद्दलही माहिती देत असतो. यासह आवश्यक ती कौशल्यं निर्माण करण्यासाठी मदत करत असतो. ‘करिअर बद्दल बोलू काही’ यावर प्रत्येक महिन्यात शंतनू ट्विटर स्पेस घेत असतो. तरुण – तरुणींपर्यंत नोकरीची माहिती पोहचविण्यासाठी काढलेल्या ट्विटर हँडलवरून योग्य तो मार्ग दाखवून कित्येकांना पुढे घेऊन चाललेला दिसत आहे.
मुलाखतीत शंतनू म्हणाला –
मुलाखती दरम्यान शंतनू सोबत संवाद साधला असता तो म्हणाला, “आपल्या मराठी तरुणांमध्ये गुणवत्ता असते. पण तांत्रिक बाबींमध्ये अनेकदा ते कमी पडतात. काही तरुणांना स्वतःचा रेझ्युमे ही तयार करता येत नाही. लिंक्डइन हा काय प्रकार असतो, त्यावर प्रोफाइल कशी बनवावी हे त्यांना माहीत नसतं. म्हणूनच उपलब्ध असणाऱ्या संधीमध्ये मराठी मुलं मुली कमी पडतात. त्यामुळे नोकरीच्या ओपनिंग्ज शेअर करतानाच, त्या कंपनीसाठी कोणती कौशल्य अपेक्षित आहेत याचा अभ्यास स्वतः मी करत असतो. त्यानुसार योग्य ती माहिती अनेकांपर्यंत पोहोचवत आहे, फिल्ड न बदलता आपण ज्या फिल्ड मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्या फिल्ड मध्ये स्किल डेव्हलप केले तर नक्कीच योग्य ती संधी मिळणार आहे”.
नोकरी शोधताना त्यानं जे दिवस पाहिलेयत ते इतरांना पाहावे लागू नये यासाठी त्याची धडपड अजूनही सुरू आहे. आतापर्यंत शंतनूनं दिडशेहून अधिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या कौशल्यावर नोकरी मिळवून दिलीय. मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलवर मागील २० दिवसातील ५००हून अधिक ओपनिंग ऍक्टिव्ह असल्याचं तो सांगतो. महिन्याभरात जवळपास १०००+ ओपनिंग शेअर करत असतो. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातच नाही तर बाहेरच्या राज्यातील लोकांना देखील त्यांच्या राज्यात जॉब मिळालेयत. यासाठी शंतनूनं मोलाची मदत केल्याचं ट्विटरवर दिसून येतं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
