पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी कोरोनाबाधित झालेल्या पोलिसांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली. ते म्हणाले की, कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार करण्यासाठी अद्यावत असं रुग्णालय तयार केलं जाणार आहे. या रुग्णालयात 50 बेड्सची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांवर विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर सहआयुक्त रविंद्र शिसवे म्हणाले की, कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये अद्यावत वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे. 50 बेडचा हा वॉर्ड पोलिसांसाठी राखीव ठेवला आहे. त्याचबरोबर दिनानाथ आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्येही बेड राखीव ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दोन हॉस्पिटलमध्येही आम्हाला काही बेड राखीव मिळणार आहे.
तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या आठ पोलिसांना दहा हजाराचा रिवॉर्ड दिला जाणार आहे. हे बक्षीस पोलीस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. तर आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये बिनव्याजी संबंधित पोलिसांना दिली जाणार आहे, अशी माहितीही शिसवे यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
