🕒 1 min read
पंढरपूर – कोरोना महामारीमुळे बंद असलेली धार्मिक स्थळं आजपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी उघडण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी धार्मिक स्थळांमध्ये मंदिर प्रशासनानं आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात दररोज 10 हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. इथे कोरोना चाचणी सक्तीची नाही मात्र, सर्वांची रांगेमध्ये आरोग्य तपासणी आणि ओळखपत्राची पडताळणी होणार आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.यात पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पास आणि पाच हजार भक्तांना ऑफलाईन मोफत दर्शन पास मिळणार आहेत.श्री क्षेत्र माहूर इथल्या रेणुकामाता मंदिरात दररोज 16 हजार पास दिले जाणार आहेत.त्यापैकी 12 हजार ऑनलाइन तर उर्वरित 4 हजार भावीक ऑफलाइन नोंदणी केलेले असतील.
तुळजाभवानी मंदिरात देखील नवरात्र उत्सव आजपासून सुरु होत असून भाविकांनी मात्र कालपासूनच मंदिरात दर्शनसाठी गर्दी केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 151 ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना होत आहे.जिल्ह्यात नवरात्रौत्सव आणि दसरा हे सण शांततेत आणि सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने पोलिस विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी शांतता समितीच्या बैठका घेतल्या असून कोरोनासंदर्भातील नियम पाळून हा नवरात्रोत्सव साजरा करावा अस आवाहन या बैठकांमध्ये करण्यात आलं आहे.
दांडिया, रास, गरबा यावर बंधनं घालण्यात आली आहेत. पुण्यातही चतु:शृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापनेला आजपासून ते विजयादशमीपर्यंत शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती कार्यकारी विश्वस्त श्रीधर अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन यावेळी करण्यात येणार असून सर्व विश्वस्त आणि कर्मचा-यांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. शारीरिक अंतराचं काटेकोर पालन केलं जाणार असून यावर्षी अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी स्वतंत्र रांग किंवा प्रवेशाची व्यवस्था करण्यात आलेली नाही.तर भाविकांना देवीचं ऑनलाइन दर्शन घेता यावे यासाठी देवस्थानच्या वतीनं विशेष सोय करण्यात आलेली आहे.
सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून भाविकांचा मंदिर परिसरात यात्रेसह दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.दरम्यान कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून देवस्थानच्या वतीने रत्ना मेमोरियल रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे.या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने नियमावली जारी करण्यात आली आहे.गरबा दांडीयावर बंदी, मंडपामध्ये पाच जणांचीच उपस्थिती, भजन, किर्तन आरती करताना गर्दी टाळावी,रावण दहन कार्यक्रम मर्यादित लोकांच्याच उपस्थितीत करावा आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
धुळे इथं सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी महापालिका,स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे इथलं मंदिरदेखील आजपासून उघडलं जाणार असून करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष पूजा,अभिषेक,आरती तसंच दैनंदिन महाप्रसाद इत्यादी सेवा भाविकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादांना आता साखर कडू वाटायला लागलीय का?; किरीट सोमय्यांचा तिखट सवाल
- ‘ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर होतोय पण आमचे नेते घाबरणारे नाहीत’
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता
- निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास; दोन महिन्यांची डेडलाईन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
