मुंबई : निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. जमातच्या मुख्यालयात 1 ते 15 मार्च दरम्यान ‘तब्लिग-ए-जमात’ हा कार्यक्रम झाला होता. नमाज अदा करत असताना कोरोनाबाधित व्यक्तीमुळे 200 पेक्षा अधिक व्यक्तींना संसर्ग झाल्याची शंका आहे. भाविक सहभागी होऊन मूळगावी परतल्याने समूह संसर्गाची भीती आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 350 भाविकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत यापैकी 24 जणांची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तब्लिग-ए-जमातमध्ये सहभागी झालेल्या तब्बल 700 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम ‘मरकज’ बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. काल रात्री उशीरापर्यंत हा परिसर रिकामा करण्याचं काम सुरु होतं.
दरम्यान, हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी 2137 जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे.
मरकजमधील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 47 जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत. औरंगाबादेत आतापर्यंत 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान 136 व्यक्ती आहेत, जे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना क्वॉरंटाईन करणं सुरू झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 16 जण उपस्थित असल्याची माहिती आहे.

