टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकातील सर्वात लक्षवेधी आणि रोमांचक असा भारत वि. पाकिस्तान सामना उद्या होणार आहे. या सामन्या आधीच भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज वातावरण निर्माण झाले आहे. त्यात या हायव्होल्टेज वातावरणात दोन्ही देशांमधून जाहिरातबाजीचे युद्ध पेटले आहे. पाकिस्तानने या जाहिरीतबाजी युद्धामध्ये पातळी सोडत भारताच्या विंग कमांडर अभिनंदनचा अवमान करणारी जाहिरात केली आहे. या जाहिरातीनंतर भारताने देखील जश्यास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हवाई दलासोबत झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर जाहिरातीत करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील नेटकरी मंडळींनी याबाबत निषेध व्यक्त केला आहे. तर आता भारताने देखील मौका मौका जाहिरातीमध्ये पाकिस्तानची लाज काढली आहे. विश्वचषक दूर राहिला तुम्हाला केवळ अभिनंदनचा उष्टा कप मिळेल असा टोला मारण्यात आला आहे.
दरम्यान मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर रविवारी भारत-पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे.आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत सहावेळा उभय संघ समोरासमोर आले आणि प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली आहे. यंदाच्या सामन्यातही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे.


