औरंगाबाद : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार तयारी सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री मराठवाड्यासाठी, औरंगाबादसाठी काय घोषणा करतात? तेही महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या विशेष घोषणांकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागून आहे. मराठवाड्याचा हक्काचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविण्यात आले आहे. तसेच मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सामान्य नागरिकांसह सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम दरवर्षी १७ सप्टेबर रोजी साजरा केला जातो. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्राम दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण केले जाते. त्यासाठी मुख्यमंत्री आवर्जून येत असतात. यंदाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानात तयारी केली जात आहे. स्मृतिस्तंभाची व चबुतऱ्याची रंगरंगोटी मंगळवारी करण्यात आली, त्याचबरोबर कार्यक्रम स्थळी मंडप उभारण्याचे कामही सुरु करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी मराठवाड्याला देण्यात आलेले क्रीडा विद्यापीठ पुण्यात हलवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. शहरातील विरोधी पक्षांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद पालिकेवर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रशासक राज आहे. लवकरच मनपा निवडणुका होऊ शकतात.
मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहरासाठी विशेषतः काय घोषणा करतात, ज्याद्वारे येणाऱ्या मनपा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मदत होईल याकडे शिवसेनेच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षही मुख्यमंत्र्यांचा आगमनाकडे डोळे लावून बसलेले आहेत. एमआमएमसह मनसेचाही समावेश आहे. खासदार इम्तियाज जलील मुख्यमंत्र्यांचे तुतारी वाजवून उपहासात्मक स्वागत करणार आहेत. तर मनसे नव्या पाणीपुरवठा योजनेचा देखावा सादर करून शिवसेनेला आपला विरोध दर्शवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दहशतवादी कृत्यामध्ये पैशांसाठी नाही तर जिहादसाठी सहभागी झालो; संशयित दहशतवाद्यांची कबुली
- विराट कोहली कर्णधारपद सोडणार; थोड्याचवेळा पूर्वी केली मोठी घोषणा
- ज्या विद्यापीठाने आर्थिक बोजामुळे १२ अभ्यासक्रम बंद केले; ते संतपीठ कसे चालवणार?
- दुर्लक्षित आकांक्षित जिल्ह्यांवर भर द्या, अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची बँकांना सूचना
- दिल दिवाना..गाणं लोकप्रिय करणारे राम-लक्ष्मण ; जयंतीनिमित्त्य वाचा त्यांचा संगीतप्रवास

