पुणे : पुणे शहरात दोन लॉकडाऊनला पुणेकरांची सकारात्मक साथ मिळाली असून कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अजूनही नियंत्रणात नसताना तिसरा लॉकडाऊन पाळण्याची पुणेकरांची तयारी आहे. असे असताना नव्या आदेशानुसार सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मिळालेली परवानगी पुणेकरांना परवडणारी नसून मोठा धोका ओढवून घेत आहोत, अशी रोखठोक भूमिका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे.
पुणे शहरात रोजच्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता आणून शहराच्या 97 टक्के भागांतील व्यवहार काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर दिवसभर लोकांची सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. त्यातून कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती महापौरांनी व्यक्त केली आहे.
पुणेकरांनी पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळले असताना आणि रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश शहराला परवडणारे नाहीत. सव्वा महिन्यात पुण्यातील परिस्थिती आटोक्यात आहे. त्यासाठी पोलीस, प्रशासन, आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन पूर्वी प्रमाणेच सुरू ठेवा. आज हजारो नागरिक रस्त्यावर आल्याने आपला उद्देश सफल ठरताना दिसत नाही, असेही महापौर म्हणाले.
यासंदर्भात पोलिसांनाही विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आज उडालेल्या गोंधळावरही महापौरांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारचे निर्णय 8 दिवसांपूर्वी का घेतले नाही, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
आज दारूची दुकाने सुरू होणार असल्याने नागरिकांनी सकाळी 7 पासूनच गर्दी केली होती. तोंडाला मास्क, रुमाल बांधून लोक ऊभे होते. शहरात काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यात येत होते. तर, कुठे नियम पायदळी तुडवीत असल्याचे चित्र दिसून आले.


