बिहार : ठरलंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाचे जेडीयू नेते नितीशकुमार मुख्यमंत्री होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील. सुत्रांच्या माहितीनुसार, हा शपथविधी सोहळा १६ नोव्हेंबरला होऊ शकतो.
मुख्यमंत्री पदाची शपथ नितीशकुमार घेतील असे भाजप आणि जदयुच्या वतीने सांगण्यात येत आहे. अशातच नितीश कुमार यांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोबत येण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले की नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार यात वादच नाही. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असे आम्ही वचन दिले होते, या वचनावर आम्ही ठाम आहोत. कोणी जास्त जागा जिंकतं कोणी कमी, हे निवडणुकीत होत असतं. पण या सत्तेचे आम्ही समान भागीदार आहोत असेही सुशील कुमार मोदी म्हणाले.
यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हा भाजपाचा व्हावा, अशी मागणी काही भाजपचे नेते करीत होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी भाजपाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत जेडीयू आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

