मुंबई: मातृदिन (Mother’s Day)हा एका आईसाठी आणि एकंदरीतच महिला वर्गासाठी विशेष दिवस आहे. ज्यांच्या योगदानाकडे कधीकधी दुर्लक्ष केले जाते, यादिवशी सर्व मातांना सन्मान दिला जातो. अशाच काही सुपर मॉम्स आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
मूल जन्माला आल्यापासून त्याचे पालन पोषण उत्तम व्हावे आणि त्याचे व्यक्तिमत्व फुलावे यासाठी आई सतत झटत असते. त्यामुळे सर्व मातांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी मातृदिन (Mother’s Day) साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. परंतु २०२२ मध्ये हा दिवस ८ मे रोजी साजरा केला जात आहे.
१. सेरेना विल्यम्स
अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा परिचय करून देण्याची गरज भासत नाही. कारण ती २३ वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन राहिली आहे. विल्यम्सने आठ आठवड्यांची गरोदर असताना ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा जिंकली होती. १ सप्टेंबर २०१७ रोजी विल्यम्सने अॅलेक्सिस ऑलिम्पिया ओहानियन ज्युनियर नावाच्या मुलीला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर सेरेनाने २०१८ आणि २०१९ मध्ये सलग विम्बल्डन आणि यूएस ओपन या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम फेर्या गाठल्या होत्या. २३ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्सने टेनिसच्या इतिहासात अत्यंत तरबेज खेळाडू म्हणून स्वतःचे नाव नोंदवले आहे. सेरेनाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
२. मेरी कोम
मेरी कोमला भारतीय बॉक्सिंगच्या सर्वोच्च शिखरावर पोहचण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने २००१ मध्ये जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले, तसेच मेरी कोमने २००२ मध्ये सुवर्णपदक जिंकले. चार मुलांची आई असलेली मेरी कोम ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी महिला बॉक्सर आहे. तिने केवळ आपल्यातील प्रतिभेच्या आणि प्रयत्नांच्या बळावर अनेक मेडल्स् मिळविले, अनेक रेकाॅर्डस् कायम केलेत असं नव्हें तर अवघ्या विश्वासमोर भारताला गौरवान्वित केले आहे.
मेरी कॉम ने बॉक्सिंगमध्ये ८ पदके जिंकली आहेत. जी इतिहासातील कोणत्याही बॉक्सर, पुरुष किंवा महिलांपेक्षा अधिक आहेत. २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर होण्याचा मान मेरी कॉमला मिळवता आला. ती पाच वेळची आशियाई चॅम्पियन देखील आहे.
मेरी कॉम २००५ साली ओन्लर शी विवाहबंधनात अडकली. विवाहापश्चात २००७ ला मेरी कोमने जुळया मुलांना जन्म दिला. त्यानंतर २०१३ ला ती पुन्हा एका मुलाची आई झाली.
३. सानिया मिर्झा
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. तिने सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदे (दुहेरी आणि मिश्र दुहेरी) जिंकली आहेत. २०१३ मध्ये सानिया एकेरीतून निवृत्ती होईपर्यंत ती भारताची एकेरीत आघाडीची खेळाडू होती. २०१० मध्ये तिने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केले. विवाहापश्चात ऑक्टोबर २०१८ मध्ये या दोघांना मुलगा झाला. त्यांच्या मुलाचे नाव इझान असे आहे.
२००५ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत वाइल्ड कार्डने प्रवेश करणार्या सानियाने तिसर्या फेरीपर्यंत मजल मारली. तिसर्या फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. चौथ्या फेरीत तिला सेरेना विल्यम्सकडून पराभव पत्करावा लागला, तरी तिचे नाव जगभर पसरले. २००६ मध्ये झालेल्या दोहा आशियाई स्पर्धेत तिने महिला एकेरीचे रौप्य तर दुहेरीत व मिश्र् दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. वडील इमरान मिर्झा तिचे प्रशिक्षक आहेत. तिने आत्तापर्यंत तेरा विजेतिपदे पटकाविली आहेत.
टेनिस करिअरमध्ये तिने ४३ दुहेरी किताब जिंकले यावरूनच तिच्या यशस्वी कारकिर्दीचा अंदाज येऊ शकतो. २०१५ मध्ये ती दुहेरीतील जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू होती. सानियाने २०१९ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर टेनिसमध्ये पुनरागमन केले. मात्र, कोरोनाच्या संकटाने तिची वाट अडवली. सानियाचा मुलगा तीन वर्षांचा असून, त्याला सोबत घेऊन प्रवास केल्याने त्याच्यासाठी धोका पत्करत असल्याचे तिला वाटत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

