🕒 1 min read
मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds)चा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स स्वतः कार चालवत होता. अचानक त्याची कार रस्ता सोडून उलटली आणि गंभीर अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सायमंड्सला तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. सायमंड्सला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी एका निवेदनातून दिली आहे.
Tragic news surrounding the former Australia all-rounder and our thoughts are with his friends and family.https://t.co/6eXiz8Mb5O
— ICC (@ICC) May 14, 2022
अँड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांसह क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. अलीकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटने शेन वॉर्नला गमावले आहे. संपुर्ण जगातील अँड्र्यू सायमंड्सच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
सायमंड्सची कारकीर्द
सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी, १९८ एकदिवसीय आणि १४ टी-20 सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटने कसोटी १४६२, एकदिवसीय ५०८८ आणि टी-२० ३३७ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १६५ विकेट घेतल्या आहेत. सायमंड्स त्याच्या आक्रमक आणि मैदानावरील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जात असे.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसाठी धक्कादायक वर्ष
सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. रॉड मार्श आणि शेन वॉर्नसारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सायमंड्सचे या वर्षी निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे. ‘क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे’, असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटलंय. मैदानावर आणि त्यापलीकडेही आमचे सुंदर नाते होते, असं पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त
ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळलेल्या सायमंड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. सायमंड्स हा १९९९-२००७ च्या क्रिकेट विश्वावर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग होता. संघ सहकाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूच्या वृत्तावर माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टने शोक व्यक्त केला. या वृत्ताने खूप दुःखी झालोय, असे गिलख्रिस्टने ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष लचलान हेंडरसन म्हणाले की, ऑस्ट्रेलियन क्रिकेटने आपला आणखी एक सर्वोत्तम हिरा गमावला आहे. अँड्र्यू अतिशय प्रतिभावान खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाच्या यशात आणि क्वीन्सलँडच्या समृद्ध क्रिकेट इतिहासाचा एक भाग म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
