मुंबई : एकीकडे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३५ वर पोहोचला आहे तर दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्ण बरेही होताना दिसत आहे. मात्र अनेक खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी आपली रुग्णालये बंद केली आहेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेनं कोणाकडे जावं? असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत काही डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये, दवाखाने बंद करून ठेवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आम्ही सर्वांना सुचित केलं आहे रूग्णालये सुरू राहतील. कोणालाही त्रास होणार नाही. खासगी डॉक्टरांनी आपली रूग्णालये, दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी जावं कोणाकडे. त्यांनी आपली क्लिनिकही सुरू ठेवावी, असं टोपे म्हणाले.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेले अनेक रुग्ण बरे होता आहेत. कोरोना बरा होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. गुरूवारी झालेल्या बैठकीत आम्ही महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच सध्या पीपीई एन ९५ च्या उत्पादनसाठी प्रयत्न सुरू आहेत. रोगप्रतिकारशक्ती आणि योग्य उपचारानं करोना हा आजार बरा होऊ शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.

