🕒 1 min read
पुणे : पुणे शहरातील काही हौसिंग सोसायटीत परदेशातून प्रवास करून आलेल्या व घरीच विलगीकरण केलेल्या प्रवाशाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. यापुढे कोणत्याही प्रवाशाला नकारात्मक टिपणी अथवा असा कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर त्यांच्याविरूदध तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल. घाबरू नका आणि बिनधास्तही राहू नका असा सल्ला देतानाच कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रशासन सक्षम आहे, यासाठी आपण प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राम बोलत होते.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. त्यांनी यात्रा, उत्सव, लग्न समारंभ असे गर्दीची ठिकाणे टाळावीत. जिल्हयात ज्या संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे ती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणूसंदर्भात कोणत्याही प्रकारची अर्धवट, खोटी, चुकीची आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणा-यांवर कार्यवाही करण्यात येईल, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याने नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. नागरिकांनी यात्रा, उत्सव, लग्न समारंभ असे गर्दीची ठिकाणे टाळावीत. असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

