औरंगाबाद : जिल्हा प्रशासन व महापालिकेने गतवर्षी कोरोना काळात कोरोना रुग्णांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी स्मार्ट सिटीबस वापरली. सध्या कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता स्मार्ट सिटीने पुन्हा एकदा ११ बसेस रुग्णांसाठी दिल्या आहेत. मात्र गेल्या वर्षीचे पैसे सिटीबस व्यवस्थापनाला अजूनही देण्यात आलेले नाहीत.
मनपाकडे तब्बल २ कोटी रुपये थकलेले आहेत. तसेच प्रवाशांना दिलेल्या सवलतींपोटी १ कोटी ६ लाख रुपये देखील अद्याप येणे बाकी आहेत. ही रक्कम मिळत नसल्यानेे स्मार्टबस संकटात सापडण्याची भीती व्यवस्थापनाकडून व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटीबस सेवा प्रशासनाने कोरोना काळात मार्च २०२० पासून बंद करण्याचा निर्णय घेतला.
मात्र नंतर औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोरोनाबाधितांची व वैद्यकीय कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी प्रशासनाने या बस वापरात घेतल्या. १०० पैकी सुमारे ६० बस या कामासाठी वापरण्यात आल्या. ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तर शहरासाठी महापालिकेने या बसचा वापर केला.
या खर्चाचा परतावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकेकडे मागितला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ४७ लाख रुपये तर पालिकेकडे १ कोटी ४६ लाख रुपये थकलेले आहेत. पाठपुराव्यानंतरही अद्याप ही रक्कम सिटीबस विभागाला मिळालेली नाही.
काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केलेली आहे. १०० पासून सुरु झालेली रुग्णसंख्या हजारांच्या पुढे जाऊन ठेपली आहे. दररोज भरती होणारे रुग्ण रिक्षातून रुग्णालयात जातात त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने महापालिकेस ११ बस तर जिल्हा प्रशासनाला २ बस ग्रामीण भागातील रुग्णांसाठी देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाकडून पैसे मिळतील ही आशा
स्मार्ट सिटीबसने कोरोना काळात दिलेली सेवा व प्रवाशांना दिलेल्या सवलतीची रक्कम मिळवण्यासाठी पालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे. त्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटीबस विभागाला पैसे देण्यास जिल्हाधिकारी व पालिका प्रशासक अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच हे पैसे मिळतील, असा विश्वास आहे.
-प्रशांत भुसारी, मुख्य व्यवस्थापक, स्मार्ट सिटीबस
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप कार्यकर्ते बिथरले, केली भाजपच्याच कार्यालयावर दगडफेक
- मनपा राबवणार माझा वॉर्ड १०० % कोरोना लसीकरण युक्त वॉर्ड मोहीम
- ठरलं तर…! कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून; तर चौथी प्रवेश फेरी…
- ‘संजय राठोड प्रकरणात ऑडिओ क्लिपशी छेडछाड केली गेली’
- ‘शिवसेनेच्या सक्रिय नेत्यांबरोबर सचिन वाझेचे व्यावयासिक संबंध’

