मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांना लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यात आता प्लाझमा थेरपीला सुरवात झाली आहे. मुंबईत आतापर्यंत शहर-उपनगरात सहा कोरोना रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्यात आला. मुंबईत शनिवारी लीलावती या खासगी रुग्णालयात एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले. आगामी काळात प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार केले जातील, अशी माहिती नायरचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिलीे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज्यात प्लाझमा थेरपीला मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता बऱ्या झालेल्या रुग्णांशी संपर्क साधत, त्यांच्या रक्ताची तपासणी करून पाच रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. सायनमध्ये दोन तर सेव्हनहिलमध्ये तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापूर्वी लीलावती रुग्णालयात पहिली, अशी थेरपी करण्यात आल्याची माहिती आहे.
तर लवकरचं नायर रुग्णालयात देखील प्लाझमा थेरपीला सुरवात केली जाणार आहे. प्लाझ्मा थेरपी गंभीर रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार असून यामुळे कोरोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचा विश्वास आता व्यक्त होत आहे. तर कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आलेल्या नायर रुग्णालयात पहिले फेरेसिस मशीन बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया वेगाने करत अधिकाधिक संख्येने रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल.
काय आहेत प्लाझमा थेरपी?
कोरोनावर यशस्वी मात करत बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरिरात प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तयार होतात. त्यानुसार त्यांच्या रक्तातील फ्रॅक्शन घेऊन ते दुसºया कोरोनाग्रस्त रुग्णांना दिले जातात. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. या थेरपीला मान्यता मिळाल्यानंतर पालिकेने तत्काळ याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

