टीम महाराष्ट्र देशा: राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, मात्र शिवसेनेत निर्माण होत असलेला अंतर्गत कलह टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काल रात्री उशिरा बैठक झाली, या बैठकीत मंत्री पदांबाबत चर्चा झाली आहे. विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र गेली साडेचार वर्षे शिवसेनेकडून मागणी करण्यात येणारे उपमुख्यमंत्री पद आता उद्धव ठाकरेच घेयला तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बाहेरून आलेल्या नेत्याला मंत्रीपद दिल जाणार असल्याने शिवसेनेतील आमदारांमध्ये आधीच धूसफूस सुरु आहे, यामध्ये पक्षाच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदावर विधान परिषदेतील आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिवसेनेला उपमुख्यमंत्री देण्यात आल्यास सुभाष देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, मात्र एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केली आहे. त्यामुळे शिवसेनेत कलह निर्माण होताना दिसत आहे.


