देहरादून : राजकारणातील भक्तमंडळी हे आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. तर त्या नेत्याची आपल्या पाठीवर थाप मिळवण्यासाठी नेत्याच्या नावाने अनेक उपक्रम, सोहळे आयोजित करत असतात. आता तर एका भाजप नेत्याने आपल्या नेत्याला म्हणजेच पंतप्रधान मोदींना खुश करण्यासाठी त्यांचे गुणगान असणारी आरती तयार केली आहे. तर ही आरती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
ही आरती उत्तराखंड राज्यमंत्री धनसिंग रावत आणि गणेश जोशी यांनी केली तयार केली असल्याचं सांगण्यात येत आहे. या आरतीत पंतप्रधान मोदींचे गुणगान गायले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर भक्त मंडळी काय करतील याचा नेम नाही, हे यावरून दिसून आले आहे.

या आरतीवरून कॉंग्रेस नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले. उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गरिमा दसौनी यावर म्हणाले की, उत्तराखंड राज्यमंत्री धनसिंग रावत आणि गणेश जोशी यांच्या या कृत्याने संपूर्ण हिंदू सनातन धर्माचा अपमान केला आहे. मोदी एक माणूस आहेत आणि त्यांना देवी-देवतांच्या श्रेणीत स्थान दिले जाऊ शकत नाही. मोदींची स्तुती करताना आरतीमध्ये वापरलेले शब्द त्यांचे देव म्हणून वर्णन करतात असा आरोप त्यांनी केला.
तसेच जे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करीत होते ते आज एका व्यक्तीपुरते मर्यादित झाले आहेत आणि त्यांच्या पादुका पूजेसाठी कोणत्याही पातळीवर येऊ शकतात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्याकडे या प्रकाराची दखल घेत या दोघांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.


