मुंबई : पावसाळ्यात मुंबईत हमखास तुंबणाऱ्या ठिकाणांव्यतिरिक्त नवे भाग बुधवारच्या पावसामुळे जलमय झाले. मंत्रालय, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी परिसर हे भाग पहिल्यांदाच तुंबले. त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सागरी किनारा मार्गाच्या कामाकडेही बोट दाखवले जात आहे.
दक्षिण मुंबईत बुधवारी चार तासांत सरासरी ३०० मिमी पाऊस पडला. मुंबईत कुठेही, कितीही पाऊस पडला तरी मंत्रालय आणि ओव्हल मैदानाचा परिसर, नरीमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह या परिसरात कधीही पाणी साचत नाही, अशी या भागांची ख्याती आहे. मात्र, बुधवारच्या पावसात हे भागही तुंबले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त करणारी ध्वनिचित्रफित ट्वीटरवर प्रसारित केली. आयुष्यात पहिल्यांदाच या भागात पाणी तुंबलेले पाहत असल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी त्यात व्यक्त केली आहे.
उच्च न्यायालयाच्या परिसरातही पावसाचे पाणी शिरल्याने न्यायालयातील बाग जलमय झाली होती. गिरगाव चौपाटीहून मलबार हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतके पाणी साचले होते की, रस्ता संपून समुद्र किनारा कुठून सुरू होतो, हेच समजत नव्हते. हा परिसर पहिल्यांदाच इतका जलमय झाल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. नव्या जलमय भागांमुळे पालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, दक्षिण मुंबईत विक्रमी पाऊस झाला. त्यातच भरती असल्याचे कारण पालिका प्रशासनाने पुढे केले आहे.
मुंबईच्या याच अवस्थेवर मनसे नेते अमेय खोपकर यांनी उपहासात्मक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केल आहे.’ पावसाची तयारी आहे ड्रेनेज लाईनमध्ये जायची, पण ड्रेनेज लाईनची तयारी आहे का पावसाला सामावून घ्यायची?? किंबहुना नसावीच…देव मुंबईचं भलं करो’ अस ट्विट करत खोपकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
पावसाची तयारी आहे ड्रेनेज लाईनमध्ये जायची, पण ड्रेनेज लाईनची तयारी आहे का पावसाला सामावून घ्यायची?? किंबहुना नसावीच…
देव मुंबईचं भलं करो ????????????????????????
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 6, 2020

