टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना घवघवीत यश मिळाल्याने देशातून कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. विशेष म्हणजे अमेठी या कॉंग्रेसच्या घरच्या मैदानावर देखील राहुल गांधींना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष चांगलाच हादरला आहे. या साऱ्या धक्कादायक निकालानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली. तर कॉंग्रेसच्या अपयशाचे खापर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांवर फोडले आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे पराभवाबाबत झालेल्या समीक्षा बैठकीत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, कार्यकर्त्यांनी एकत्र येत काम केले नाही. काम करते वेळी मतभेदांमध्ये अडकून बसले. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला. आता पराभव झटकून टाका आणि पुन्हा कामाला लागा असं आवाहन देखील कार्यकर्त्यांना केलं. तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कार्यकर्त्यांमुळे नाही तर जनतेनं विजयी केलं असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या लोकसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा भाजपलाच देशाच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी दिली आहे. तर कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या बाबतीत नाराजी दाखवली आहे. या निवडणुकीत देखील कॉंग्रेसला विरोधी पक्षाला आवश्यक असणाऱ्या जागा मिळवता आल्या नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष आता डबघाईला आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

