मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र आर्थिक तिजोरीवर येणार ताण पाहता काही उद्योग धंदे सुरु करण्याबाबतचा विचार राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील उद्योग सुरु करण्याबाबत उद्योग विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे.
ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे किंवा अजिबात नाही अशा ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकारने कृती गट स्थापन केला होता. या कृती गटाचा अहवाल आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सादर केला जाणार आहे. तसेच केंद्र सरकारनेही 20 एप्रिलनंतर कोणते उद्योग आणि सेवा सुरु करायचा आहेत याबाबत बुधवारी नियमावली जारी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता गृहमंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहेत. यात शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी देशाचे लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवले आहे. मात्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून हा लॉकडाऊन काही भागात शिथिल करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे.
गृहमंत्रालयाने जरी केलेली नियमावली ही हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी लागू होणार नाही. तर हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात येणार आहे. आता जरी केलेल्या नियमावलीनुसार रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी, ई कॉमर्स, शेतीवर आधारित उद्योग या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

