टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपात झालेले जोरदार इनकमिंग आता विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर देखील पहायला मिळणार आहे, सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठोपाठ आता कॉंग्रेस – राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये माढ्याचे आ. बबनदादा शिंदे यांचे नाव देखील आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सोलापूर जिल्ह्याला आजवर आघाडीचा बालेकिल्ला समजले जात, जिल्ह्यातील ग्रामपंचायत ते आमदार, खासदारांपर्यंत सर्व सत्ता दोन्ही कॉंग्रेसकडे राहिलेल्या आहेत. मात्र बदलत्या काळानुसार सत्तांतर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश करत राष्ट्रवादीला जोरदार दणका दिला होता. मोहिते पाटील यांच्या पाठोपाठ कल्याण काळे, विजयराज डोंगरे यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे.
आता विधानसभेच्या मुहूर्तावर भाजप प्रवेशामध्ये माढ्याचे आ. बबनदादा शिंदे, अक्कलकोटचे आ. सिद्धराम म्ह्नेत्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, डीसीसीचे माजी संचालक सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांच्यासह कॉंग्रेसचे बाळासाहेब शेळके यांचा समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. आ. बबनदादा शिंदे यांनी मात्र भाजप प्रवेशावर कोणाशीही बोलणे झाले नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, भाजप प्रवेशासाठी उत्सुक असणाऱ्या नेत्यांनी आधी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करावी, पुढे आपण बोलू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते.
युतीतील जागा वाटपामुळे अनेक नेते वेटिंगवरच
जिल्ह्यातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेशास उत्सुक असले तरी ११ विधानसभा मतदारसंघा पैकी निम्मे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे भाजपच्या वाटेवर असणाऱ्यांना सध्यातरी वेटिंगवरच रहावे लागणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

