मुंबई : राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार यावर आता शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातचं आता शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी लवकरात लवकर आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. तर त्यांच्याबरोबर नीलम गोऱ्हे देखील मैदानात उतरल्या आहेत.
तसेच विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस कडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊल असे संकेत भाजपकडून देण्यात येत आहेत.
तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सहा जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. आमच्याकडे असलेलं संख्याबळ पाहता सहा जागा निवडून शकतात. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येतील, असं थोरात म्हणाले.
दरम्यान भाजपकडून कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपमध्ये मोठा नाराज गट होता. त्यामुळे या नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप कसे पाऊलं उचलणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजपमधून पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विजयसिंह मोहिते पाटील यांची नावं आघडीवर असल्याचं बोललं जात आहे.


