🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विरोधकांनी सत्तेत असतांना 15 वर्षे केवळ भूलथापा मारल्या. सामान्य माणसाला नागवले. शेतकर्यांना नागवले. लोकशाही त्यांच्या लक्षात येत नाही. प्रेमाने मते मागितली तर मिळतात. तुम्ही धमक्या दिल्या तरी उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. निवडून दिले नाही, तर उस घेणार नाही म्हणत असतील, तर सरकार आपले आहे, चिंता करु नका, नवीन कारखाना उभा करु, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांवर हल्ला चढविला आहे. उस शेतकर्याचा आहे, तुमच्या बापाचा नाही. शेतकर्याला नागवले तर शेतकरी तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीत धमकीला जागा नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
कारखान्याला उस घालायचा असेल तर मतं द्या, असे विरोधक म्हणत असल्याचे राम शिंदे यांनी भाषणात म्हटले होते. त्याचा धागा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कारखान्याने शेतकर्यांचा ऊस नाही घेतला, तर नवीन कारखाना उभारू, अशा शब्दांत शेतकर्यांना नवीन कारखाना उभारण्याचे आश्वासन दिले.विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. समोर कुणी विरोधक दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीत मजा येत नाही. निवडणुकीचा निकाल आता लहान मुलालाही माहिती आहे. आमचा पहिलवान रामभाऊ लालमाती लावून गोद्यात उतरलाय. विरोधकांना आपला पराभव दिसला आहे. त्यामुळेच राहुल गांधी बँकॉकला गेलेत. पवार साहेबांची अवस्था ‘आधे इधर जाओ, आधे इधर आओ’ अशी झालीय, असे ते म्हणाले.
विदर्भात शरद पवार यांनी नागपूरच्या गुन्हेगारीवरुन मुख्यमंत्र्यांवर निषाणा साधला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. केवढी आमची दहशत झालीय, माझ्या सारख्या साधारण नागपूरकराने यांना एवढे जेरीस आणलेय, की यांना सगळे नागपूरकर गुंड दिसायला लागलेत. पहिल्यांदा राज्यात पवारांची अशी अवस्था तुमच्या आशीर्वादामुळे झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

