🕒 1 min read
धुळे : राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र विरोधकांकडून सतत सत्ताधारी पक्षांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ठाकरे सरकार फार दिवस टिकणार नाही अशी भविष्यवाणी देखील करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केलं. खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी धुळे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘महाविकासआघाडीचे सरकार उत्तम प्रकारे काम करत असून हे सरकार 15 वर्षे टिकेल. मात्र, आमच्या सरकारबाबत माध्यमांद्वारे समज-गैरसमज पसरले जात आहेत. याबाबत आम्ही कोणतीही चिंता करत नाही,’ असा विश्वास सुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, दिल्ली येथे झालेला हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेला गृहमंत्रालय जबाबदार असून गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे. त्यामुळे या घटनेप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

