🕒 1 min read
अमरावती:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. निवडणुकीत बहुतेक जागांवर सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली असताना अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार ॲड.किरण सरनाईक यांनी प्रस्थापितांना घाम फोडला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे.
किरण सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातील आहे. अकोला-वाशिम हा संयुक्त जिल्हा असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी विधान परिषदेच्या आमदार म्हणून निवड केलेल्या मालतीबाई सरनाईक यांचे ते पुत्र आहेत. किरण सरनाईक हे अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. वाशिममधील एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहे. ते स्वतः शिक्षक आहेत. माजी मंत्री बाबासाहेब गोविंदराव सरनाईक यांच्या कुटुंबातील असलेले सरनाईक हे सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत.
अमरावतीमध्ये श्रीकांत देशपांडे हे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे उमेदवार म्हणून लढत असतानाही सरनाईक यांनी मारलेली मुसंडी चकित करणारी ठरली आहे. दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- आता भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय – शशिकांत शिंदे
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- Kid of the Year, भारतीय वंशाची गीतांजली राव TIMEच्या सन्मानाची पहिली मानकरी


