🕒 1 min read
केरळ : कोरोनावर विजय मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक बातमी आहे. भारतात आता सर्वात स्वस्त टेस्ट कीट तयार करण्यात आली आहे. या टेस्ट कीटद्वारे कमी किमतीत आणि फक्त 2 तासांत कोरोनाचे निदान होऊ शकणार आहे. त्यामुळे निदानासाठी लागणारा वेळ आता वाचणार असून याचा उपयोग तत्काळ उपचारासाठी होणार आहे. news18 लोकमतने यबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या चाचण्या करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आता केरळमधील काही संशोधकांनी एक टेस्ट कीट तयार केली आहे. तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अॅण्ड टेक्नोलॉजीने (SCTIMST) ही चाचणी किट तयार केली आहे. या कीटचा वापर करून अगदी कमी खर्चात कोरोनाचे निदान होऊ शकेल.
चित्राने तयार केलेली GeneLAMP-N किटला कोव्हिड-19 चाचणीसाठी इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (ICMR) मंजूरीची गरज आहे. SCTIMSTचे संचालक आशा किशोर या म्हणाल्या की, आयसीएमआरने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), आलप्पुझा यांना चाचण्या मान्य करण्यासाठी अधिकृत केले होते आणि सीडीएससीओने त्यासाठी परवाना दिला होता. एनआयव्हीच्या चाचणीत असे दिसून आले आहे की चित्रा GeneLAMP-N आरटी-पीसीआर निकालाबरोबर शंभर टक्के अचूकता आणि एकरुपता दर्शविली आहे. त्यामुळे हे कीट येत्या काळात सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
मशीनमध्ये एकाच बॅचमध्ये तीस नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते. त्यामुळे एका दिवसात जास्तीत जास्त लोकांची तपासणी केली जाऊ शकते. जिल्हा रुग्णालयांच्या प्रयोगशाळांमध्येही चाचणी सुविधा सहजपणे सुरू करता येईल, असे आशा किशोर यांनी सांगितले.


