औरंगाबाद : औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. याबैठकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी उजनीच्या पाण्याचा विषय लावून धरणे आवश्यक होते. मात्र मराठवाड्यातील सत्ताधारी नेते शांत राहिले. फडणवीस यांच्या काळात मराठवाडा वॉटर ग्रीड मंजूर केले होते. त्यामध्ये लातूरला सिना कोळेगावच्या माध्यमातून म्हणजे उजनीतूनच लातूरला पाणी आणण्याची योजना होती. ती या सरकारने रद्द केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा रिमोट ज्यांच्या हातात आहे त्यांना उजनीचे पाणी विषय काढलेले आवडत नाहीत. विषय काढला तर आपल्याला मंत्रिमंडळातून काढले जाईल या भीतीने सत्ताधारी बोलत नसावेत,’ असा टोला भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लगावला.
केंद्राच्या अर्थसंकल्पात मराठवाडा आणि लातूर जिल्ह्याला किती निधी मिळाला, त्याचा फायदा किती होणार आहे, याची माहिती देण्यासाठी भाजपने लातूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात भाजप आमदार उजनीचे पाणी लातूरला आणण्यासाठी आवाज उठवणार आहेत.
‘केंद्रीय अर्थसंकल्पात लातूर इथल्या रेल्वे बोगा कारखान्यासाठी ४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे तो प्रकल्प पूर्ण होणार आहे. जलशक्ती मिशनचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यात लातूर जिल्ह्याला होणार असून जिल्ह्यातील १६३ गावांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली. मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी सोलापूर उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्ग व्हाया तुळजापूर जाणार असून, त्या ८४ किलोमीटरसाठी २० कोटींची तरतूद झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मराठवाड्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते निष्क्रिय आहेत. बैठकीत बोलण्याऐवजी गप्प बसतात. पश्चिम महाराष्ट्रातील नेते मराठवाड्यावर अन्याय करत नाहीत, तर आपलेच नेते करतात असा आरोप भाजप आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. उजनीच्या पाण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी ते का ठेवत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विद्यापीठाने निर्भयपणे काम करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य’
- देवगिरी किल्ल्यात स्वच्छता करून ‘शिवजागर’
- महाविकास आघाडीने छत्रपतींच्या गादीचा अपमान केला; निलेश राणेंची सडकून टीका
- ‘त्या’ मुलीचा मृतदेह बंधाऱ्यातील पाण्यात सापडला
- ‘तुम मुझे पांच हजार दो, मैं तुम्हे एक लायब्ररी दुंगी’


