टीम महाराष्ट्र देशा : मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’ गाठली. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल टि्वट करून माहितीही दिली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झालं आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धव ठाकरेजी यांची आज मातोश्री येथे भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 14, 2019
बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात होणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यापासून सुरु होती, खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला होता, मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चासुरु झाली होती त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी थेट मातोश्री गाठून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे.
गेली साडेचार वर्षे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, त्यामुळे युतीतील अनेक नेते आपल्याला शेवटच्या टप्यात मंत्रीपद मिळण्याची आशा लावून बसले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादीतील अनेकांनी भाजप – शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजप – सेनेतील नेते नाराज आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, मोहिते पाटील पिता – पुत्र, तसेच शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.


