औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद मनपा प्रशासनाच्या वतीने विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तीन दिवसात दोनशेहून अधिक जणांकडून लाखाच्या वर दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना बधितांचा आकडा वाढत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. देशाचा लॉकडाऊन देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यामुळे वाढविण्यात आला. त्यात शहरातील बायजीपुरा भागात १७ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. आतापर्यंत सापडणारे रुग्ण हे आधीच बाधित असलेल्या रुग्णाच्या परिसरातील होते. मात्र हा रुग्ण नवीन वस्तीमध्ये मिळाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात २५ रुग्ण असून नागरिक अत्यावश्यक काम आहे, अशी बतावणी करून फिरताना दिसत आहेत. त्यामुळे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या पुढाकाराने शहरात मास्कसक्ती करण्यात आली. पहिल्या वेळेस पकडल्यावर दंड आणि सदर व्यक्ती पुन्हा विनामास्क आढळल्यावर त्यावर थेट गुन्हा नोंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
शहरातील नागरी मित्र पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. पडणार असाल तर मास्क घालून बाहेर पडावे ते नागरिकांच्याच हिताचे असल्याने त्यांनी हलगर्जी पणा करू नये.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

