औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर मागील ९७ दिवसापासून बंद असलेल्या अजिंठालेणीची कवाडे गुरूवार दि.१७ पासून पर्यटकांसाठी काही निर्बंधांसह खुली करण्यात येणार असल्याच्या जिल्हाधिका-यांच्या आदेशा नंतर बुधवारी दि.१६ अजिंठा लेणी परिसरात चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. बुधवारी सकाळीच अजिंठा लेणी सफाईसाठी उघडण्यात आल्याने कर्मचारी व पर्यटन व्यावयायिकांमध्ये उत्साह दिसत होता. पर्यटन व्यावसायावर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायिकांच्या अर्थचक्राला पुन्हा एकदा चालना मिळणार असल्याने पर्यटनस्थळे खुली करण्याच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर मागील वर्षी सलग ९ महिने बंद राहिलेल्या जगप्रसिद्ध अजिंठालेणीची कवाडे कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या वेगाने सुरु झालेल्या प्रसारामुळे १२ मार्च रोजी पुन्हा बंद करण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अजिंठालेणी सुमारे ९७ दिवस सलग बंद असल्याने येथील पर्यटन व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कुचंबणा झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान मागील काही दिवसापासून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत असल्याने भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक एन.के पाठक यांनी परिपत्रकाद्वारे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील पुरातन स्मारके व पर्यटनस्थळे १६ जून पासून पर्यटकांनासाठी खुली करण्याचे संकेत दिले होते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना निर्बंध लागू असल्याने अजिंठालेणी खुली होते की नाही या बाबत संभ्रम निर्माण होऊन संपूर्ण पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष जिल्हाधिका-यांच्या निर्णयाकडे लागून होते.
या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी गुरुवारी दि.१७ सकाळ पासून कोरोना नियमांनुसार अजिंठालेणी खुली करण्याचा निर्णय जाहीर केल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बुधवारी सकाळ पासूनच अजिंठालेणी व पर्यटन महामंडळाचे व्यापार संकुलन, वाहनतळ आदी ठिकाणी पर्यटन महामंडळ व भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांनी साफसफाई व सॅनेटरायझेशन मोहीम राबवित पूर्व तयारीला सुरुवात केल्याचे दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

